"एका हातातील लेखणीने स्वराज्य जागवले तर दुसऱ्या हातातील शब्दांनी माणूस जागवला".....
अशा या दोन युगपुरुषांना आज शनिवार दि.1 ऑगस्ट 2026 रोजी सी.एच.एम.इ.सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला पाचवी ते सातवी मराठी माध्यम या शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्गा-वर्गात 'बालसभा' या उपक्रमांतर्गत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहिली.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण,आत्मविश्वास, सभाधिटपणा, सांघिक कार्याची भावना आणि वक्तृत्व कौशल्य विकसित करणे तसेच राष्ट्रपुरुषांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये देशभक्ती आणि सामाजिक समतेची जाणीव निर्माण करणे हा या बालसभेचा मुख्य उद्देश.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फलक लेखन,सजावट,स्वागत, सूत्रसंचालन इ. हे सर्व नियोजन विद्यार्थ्यांनी स्वतः केले. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली,त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लोकमान्य टिळक यांच्या 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' या विचारांवर आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यावर माहिती तसेच स्वगत सादर केले, तर काही विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास,साहित्य तसेच सामाजिक समतेच्या विचारांवर माहिती सादर केली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात सादर केलेले पोवाडे....
विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणाद्वारे दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा गाभा अतिशय सोप्या भाषेत सर्वांसमोर मांडला. उपस्थित सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाचे आणि सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. अशाप्रकारे ही बालसभा देशभक्तीमय वातावरणात अतिशय उत्साहात पार पडली.